Monday, November 26, 2018

वाचता वाचता

झेनच्या सहजस्फूर्त निर्मितीचा
सहज सुंदर आदर्श  : ‘गायतोंडे’ग्रंथ !

-  प्रदीप  सं नेरुरकर
भाग १

एका साध्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात चाळीत राहणारा माणूस स्वतःच्या कल्पनेतलं अदभूत विश्व साकारण्याचा कल्पनेनं झपाटलेला, अगदी लहानपणापासून चित्रकला विषयात अतीव रस असलेला, या चित्रांपुढे बाकी सर्व संसारावर तिलांजली देऊन कलेच्या एकाच ध्यासाने पछाडलेला. जेव्हा साऱ्या भौतिक सुखांकडे पाठ फिरवून चित्रकलेचं एक अत्युच्च शिखर गाठतो आणि आपण आपलं ध्येय पूर्णतः गाठलंय हे मग कळून न कळूनही त्यापलीकडच्या एका योग्याच्या व ऋषीच्या जीवनाच्याही पल्याड पोचतो त्या प्रवासाची एक अदभूत झलक आपल्याला ‘ गायतोंडे’ नावाच्या ‘चिन्ह’ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या देखण्या अप्रतिम ग्रंथात वाचायला मिळते.
प्रथमदर्शनीच अत्यंत सरळ सोपं साधं काळ्या पांढऱ्या रंगातलं ‘गायतोंडे’च्या चित्राच्या पार्श्वभूमीवर विचारात बसलेले गायतोंडे त्यांच्या चित्रांतल्या अक्षराकारातच सामावून गेलेले दिसतात. फक्त ‘गायतोंडे’ शीर्षकाची अक्षरे केवळ आपल्याला दिसतात. चांगला, सुंदर, देखणा कागद नि त्यावरची नेमकीच नजरेला सुखावणारी छपाई त्यांतली चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांची अदभूत चैतन्यमय चित्रे, रेखाचित्रे आणि त्यांची दुर्मिळ छायाचित्रे यामुळे हा ग्रंथ सहज सुस्वरूप झालाय. जसं संपादक सतीश नाईक यांनीच म्हटल्याप्रमाणे “कुठलीच गोष्ट ओढून ताणून करायची नाही. ग्रंथ निर्मितीच्या प्रत्येक टप्प्यात जे जे घडत गेलं, ते ते तसं तसं घडून देत गेलो.” हे असं काहीसं झेन तत्वच संभाळून त्यांनी जरी या ग्रंथासाठी काही काळ गेला तरी झेनच्याच सहजस्फूर्त निर्मितीचा एक सहज सुंदर आदर्शच आपल्यासमोर ठेवलाय यात शंकाच नाही. यासाठी त्यांनी घेतलेले अपरंपार कष्ट, मनःस्ताप, संकटं नि अरिष्ट यावर न खचता केलेली मात, तसेच या कामातल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक गुंतवणूक यावरही आपली पत्नी नीता नाईक हिच्या खंबीर पाठबळामुळे केलेली मात ही नक्कीच अतिशय कौतुकास्पद आहे. 

‘चिन्ह’ प्रकाशनने दुसऱ्या पर्वात २००१ पासूनच ‘गायतोंडे’ विशेषांक (२००१, २००६ व २००७) ‘भास्कर कुलकर्णी’ विशेषांक (२००३) ‘नग्नता : चित्रातली आणि मनातली’ ‘यत्न-प्रयत्न’ विशेषांक असे नवनवे नि नव्या जुन्या मराठी चित्रकारांवरचे अंक एखाद्या कला चळवळीच्या उत्साहाने काढले आहेत नि त्याला उत्तम प्रतिसादही मिळालेला आहे. चित्रकारितेबरोबरच उत्तमी पत्रकारिता नि खास नजर असलेल्या सतीश नाईक यांच्या ‘चिन्ह’ कला चळवळीचा ‘गायतोंडे’ हा ग्रंथ ‘कळसाध्याय’ म्हटला तर अतिशयोक्ति होणार नाही.

‘गायतोंडे’ या ग्रंथाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पात एकूण चित्रकार वासुदेव सांतू गायतोंडे यांच्या घरातला, शहरातला जे. जे. स्कूल ऑफ आर्टचा नि त्या नंतरच्या आयुष्याचा केवळ चित्रकलेचा प्रदीर्घ प्रवास विलक्षण ताकदीने या सर्व लेखकांनी सादर केला आहे. त्यात गायतोंडेंचा स्वभाव, त्यांची स्फूर्ती व श्रद्धास्थाने, तसंच त्यांचं विचारविश्व आणि कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रदर्शने व स्वतःची कला यावरची वेळोवेळी केलेली भाष्ये नि मते अत्यंत वेधकपणे मंडळी आहेत. त्यातून गायतोंडेंचं विलक्षण व्यक्तिमत्व साकार झालंय.

गायतोंडेंच्या कौटुंबिक जीवनाविषयी सांगायचं तर गिरगावातल्या कुडाळदेशकर वाडीतलं चाळीतलं अडीच खोल्यांचं असलेलं त्यांचं घर. चौकोनी कुटुंबात ते स्वतः, प्रेमळ आई, दोन बहिणी व कडक स्वभावाचे गायतोंडेंना लहानपणी चित्रकलेला विरोध करणारे वडील. घरातल्या विचित्र वातावरणामुळे लहानपणी जे जे स्कुलमध्ये शिकतांना झालेली चित्रकाराची घुसमट. वडिलांची त्या काळी असलेली दहशत, तिला तोंड देऊन सतत चित्रे काढणारा बाळ गायतोंडे. हा त्यांची बहीण किशोरी दास यांनी लिहिलेल्या लेखातच “बाळ हा चित्रकार म्हणून जन्माला आला होता.” ही असलेली जाणीव नि पुढे जिच्याशी झालेला दुरावा नि बाळचा पुढील आयुष्याचा कलाप्रवास विस्ताराने त्यांनी कौटुंबिक पद्धतीने मांडला आहे. 

‘गायतोंडे’ या ग्रंथात A4 साईझच्या मोठ्या आकाराची २१६ पृष्ठे असून एकूण सोळा लेख असून कौटुंबिक विभागात किशोरी दास (बहीण), शांताराम वर्दे वालावलीकर (आतेभाऊ), सुनीता पाटील (शेजारीण) यांचे तर जे जे स्कूल्सही संबंधित विश्वास यंदे, फिरोझ रानडे, प्रफुल्ला डहाणूकर, मनोहर म्हात्रे व सच्चिदानंद दाभोळकर या सहकारी शिष्य मित्रांचे, तसेच लेखक पत्रकार ज्ञानेश्वर नाडकर्णी आणि शरद पाळंदे, लक्ष्मण श्रेष्ठ, दादीबा पंडोल, नरेंद्र डेंगळे यांचे गायतोंडेंच्या कलासमीक्षासंबंधीचे लेख व शेवटी सुनील काळदाते व नितीन दादरवाला यांचे गायतोंडेंवर केलेल्या फिल्मसंबंधी लेख, याबरोबरच गायतोंडेंनी वेळोवेळी दिलेल्या मुलाखतीतील निवडक मुलाखती, श्री निसर्गदत्त महाराजांशी झालेला संवाद आणि ‘नवकला आणि मी’ हा खुद्द गायतोंडेंचा लेख. त्याबरोबरच रंगीत नि श्वेतधवल २९ प्रकाशचित्रे तसंच ५५ रंगीत चित्रे शिवाय कृष्णधवल प्रकाशचित्रे यांचा या पुस्तकात समावेश आहे. याबरोबरच या प्रकल्पाचे नि ‘चिन्ह’ प्रकाशनाचे संपादक सतीश नाईक यांचं या पुस्तक निर्मिती करतानाचे काही काळाचे खडतर अनुभव सांगणारी २४ पृष्ठांची ‘गायतोंडे - एक न संपणाऱ्या शोधाची कहाणी’ विशेष पुरवणी म्हणून या ग्रंथाबरोबरच देण्यात आली आहे. तीही खचितच वाचनीय आहे. या ग्रंथासाठी सतीश नाईकांनी किती अपार मेहनत नि कष्ट घेऊन प्रांजळपणे सांगितलेल्या या हकीकतीमुळे कळते की त्यांनी घेतलेले श्रम खरोखरच सार्थकी लागलेत.

पुस्तकाच्या प्रस्तावनेत प्रभाकर कोलते यांनी मांडलेल्या ‘बाकी इतिहासा’तूनही त्यांनी या ग्रंथाला केलेलं अमोल सहाय्य, अप्रतिम साठा नि भरघोस पाठिंबा यामुळे आज हा ग्रंथ अत्यंत दिमाखात प्रसिद्ध झालाय. त्यात गायतोंडेंची चित्रं पाहतानाचा जो अनुभव व्यक्त करतात, तो अत्यंत हृदयस्पर्शी आहे. ते म्हणतात “केवळ त्यांचं चित्र, कुठल्याही उत्प्रेक्षा-उपमेशिवायचं फक्त चित्र. मला दिग्मूढ करणारं. त्या वेळी प्रत्येक अनुभवाचा अर्थ लावणारी माझी साक्षर बुद्धिमत्ता चक्क मला सोडून गेली. माझ्या शरीरातली एकूण-एक इंद्रिये, हाडामांसासकट मला न सांगता पसार झाली आणि मी मग एक संवेदनशील हवेनं लठ्ठ फुगलेला फुगा होऊन उरलो….”

गायतोंडेंना जे. जे. चे ग्रंथपाल विश्वास यंदे यांनी पॉल ब्रॅंटनचं ‘ए सर्च इन सिक्रेट इंडिया’ हे बहुधा त्याच्या भारतातल्या आध्यात्मिक जीवन प्रवासाविषयीचं पुस्तक प्रथम वाचायला दिलं. पुढे रमण महर्षीचंही पुस्तक त्यांनीच देऊन गायतोंडेंना अध्यात्माची गोडी लावली आणि अशी पुस्तके नि त्यांचं वाचन त्यांना चिंतनाकडे घेऊन गेलं असावं. पण बहुधा त्यांची वृत्ती तशी असावी म्हणूनच संत सोहिरोबानाथ आंबिये अभंगांचं पुस्तक वाचून त्याना - “जब सोहिरा सोहं तख्तपर बैठे” या ओळी वाचून सोहिरोबांचं तख्त कुठचं याची उत्सुकता निर्माण झाली. “मी काही करीतच नाही. पेंटिंग आपोआप घडतं.” किंवा “जे मुळात आहे, तेच मी साकारलं.” , “मी मौनात गेलो.” अशी वक्तव्ये - त्यांचा दाखला विश्वास यंदे देतात. त्याच्या मते गायतोंडेंना अखेरच्या काळात झालेला अपघात नि त्यामुळे आलेलं अपंगत्व ही नियतीचीच जणू परीक्षा होती. नि त्यातूनच ते पुढे सिद्ध झाले असेही ते म्हणतात. त्यांच्या चित्रांमागची तपश्चर्या व चित्र पूर्ण झाल्यानंतरची विरक्तीही ते जाणतात. 
तर प्रफुल्ल डहाणूकरांच्या लेखात जे. जे चे नि भुलाभाई संस्थेचे ‘फुलपंखी दिवस’ आठवतात आणि हुसेन बी. प्रभा, बी. विठ्ठल, नसरीन मोहंमदी, मनोहर म्हात्रे या ग्रुपबरोबर केलेल्या भटकंती चित्र प्रदर्शने चर्चा नि वादविवाद - त्यातलं स्मरणरंजन, चिंतनमग्न ‘गाय’ सांगतांना, ते “माय पेंटिग्ज आर झेन” असं म्हणत, त्यांच्या घरात उठलेली भावनांची वादळे शमवण्यासाठीच तो अध्यात्माकडे वळला असं मत त्या व्यक्त करतात.

या पुस्तकातला एक महत्वाचा लेख आहे. मनोहर म्हात्रे यांचा. त्यांच्या मते “आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नचिन्हाला त्यांनी आपल्या चित्रांचा विषय बनवला.” असं म्हणतांना वास्तवाचं त्याच्या चित्रातलं रूपच जणू ते शोधतात. म्हात्रे त्यांचे शिष्य व नंतर मित्रही गायतोंडेंचं प्रभावी व्यक्तिमत्व त्यांनी सोबतीनं पाहिलेले ‘लास्ट फॉर लाईफ मूला रुजू, बा ‘गॉन विथ द विंड’ हे चित्रपट “आजूबाजूच्या माणसातला आनंद शोधा”, व “चित्र हे स्वानंदासाठीच मी रंगवतो.”

“प्रत्येक चित्र स्वयंभू असून आपल्या आवडीचा चित्रकार निवडून त्याद्वारे भूतलावर उतरतं.” अशी भाषा चित्रकार वापरतो, तेव्हा तर त्यांची अध्यात्मवृत्तीच प्रगट होते म्हटलं तर चूक ठरू नये. गंमत म्हणजे मनोहर म्हात्रे हे ज्योतिष पाहणारे असूनसुद्धा यांनी कधी आपलं व कुणाचं भविष्य पाहण्याची उत्सुकतासुद्धा दाखवली नाही. आणखी एक म्हात्रे सांगतात - स्वतःच्या तोंडाने स्वतःच्या चित्रांची त्यांनी कधीच किंमत केली नाही. “माझ्या जगण्यावर कोणाचा अधिकार नाही.” असं स्वाभिमानानं सांगणाऱ्या गायतोंडेंना जीवनातल्या परम-पदापर्यंत पोहोचलेली माणसं सतत खुणावत राहिली. असा निष्कर्ष म्हात्रेच काढू शकतात.

सच्चिदानंद दाभोळकरही त्यांच्या लेखात “पेंटिंग सहज झालं पाहिजे.” आणि “आर्टिस्ट जसजसा मोठा होत जातो. तसतसा तो सोपेपणाकडे वळतो.” हे निरीक्षण नोंदवतात.

शरद पाळंदे, लक्ष्मण श्रेष्ठ व नरेंद्र डेंगळे यांचे तीन लेख विविध भूमिकांतून गायतोंडेंच्या चित्रांविषयीच बोलतात. त्याचं कला विश्लेषण, आस्वाद नि स्वरूप यावरच त्यांचा सारा भर असतो. त्यांच्या चित्रांविषयी तिघानाही जबरदस्त कुतूहल आहे नि जे त्यांच्या चर्चेतून नि पाहण्यातून पुरेपूर वसूल करतात. आपल्या स्नेहाची नि आनंदाची पावती स्वखुशीने देतात. गायतोंडेही ज्यांच्याशी त्यांची नाळ जुळते त्यांच्याशी एकरूप होऊन संवाद करीत असत. कुणालाही दुखावणं त्यांना जमत नसे.

शरद पाळंदे म्हणतात की गायतोंडे हे जीवनाचा आनंद घेणारे व घ्यायला लावणारे होते. स्वतःच्या आखलेल्या चौकटीच्या बाहेरच्या लोकांपासून ते अलिप्त रहायचे. स्वतःचा थांग दुसऱ्याला जाणीवपूर्वक लागू न देणारं हे अजब रसायन होतं. ते समुद्राकडे एकटक पहात तासनतास बसत. लाट कशी येते, नि कशी जाते ? त्यांच्या मते जाताना ती लाट तुमच्यातलं काही तरी नेत असते ? ते काय तर ती एनर्जी नेते - अफाट वाचन नि मनस्वी चिंतन हेच त्यांचं जीवन. ते कृष्णमूर्तीच्या तत्वज्ञानावर बोलत माणसाच्या जगण्याचं प्रयोजन काय ? जीवनाच्या प्रवासात तो काय शोधतो ? हे त्यांचे गहन प्रश्न असायचे. त्यांनी कलेचं कधी अवडंबर केलं नाही. मेंदू, हात, ब्रश, रंग नि कागद या सगळ्यांचा संबंध ज्या प्रेरणेनं साधला जातो, तो त्यांच्या दृष्टीनं महत्वाचा होता.
अपूर्ण...

वाचता वाचता

झेनच्या सहजस्फूर्त निर्मितीचा
सहज सुंदर आदर्श : ‘गायतोंडे’ ग्रंथ !
भाग २

. प्रदीप  सं नेरुरकर 



तर लक्ष्मण श्रेष्ठ नि गायतोंडे यात एका पिढीचं अंतर असूनसुद्धा ते मित्र होऊ शकले, कारण त्यांच्या ‘शांततेचा भंग’ न करणारा म्हणून तो आवडला. लक्ष्मण म्हणतात “त्यांची बोलण्याची गरज खूप कमी होती.” शांततेचे रिकामे अवकाश त्यांना आवडायचे. स्वतःतच रमण्याची वृत्ती. ते म्हणायचे “पेंटिंगमध्ये किंवा आयुष्यात एकही जास्तीची गरज नसलेली गोष्ट आली की ते बिघडतं.” म्हणून ते सदैव जीवनात दक्ष रहात. “सगळ्यातून एकेक गोष्ट कमी करत जायची, मग त्यात शेवटी शिल्लक राहतो तो इसेन्स वा गाभा.” “गायतोंडे नि निसर्गदत्त महाराज यांच्याकडून मी स्वतःतल्या सत्याशी प्रामाणिक रहायला शकलो.” असं अमूर्त चित्रकार श्रेष्ठ म्हणतात. गुरु शिष्यांचा अत्यंत सहज अनाग्रही संबंधांचा नि मूर्तिमंत सौहार्दाचा प्रत्यय त्यांचा लेख आपल्याला देतो.


१९७४ ते १९८३ या काळात दिल्लीत राहणारे नरेंद्र डेंगळे यांचा गायतोंडेंशी घनिष्ठ संबंध आला होता. त्यांनी त्यांच्या चित्रांचे केले विश्लेषण अत्यंत संवेदनशील मानाने केले आहे. ते त्यांना वेळोवेळी भेटत असत. त्यांच्या चर्चाही होत असत. गायतोंडेंच्या चित्रांविषयी लिहिताना ते म्हणतात “त्यांची कला नैसर्गिक, आत्मशोधक व जागृत जीवनाचा एक सहज अविष्कार होता.” त्यांच्या मते “रंग आकार नि पोत हेच दृष्यकारांना पहायचे निकशबिंदू होत.” गायतोंडेंची उदृत केलेली ही काही उदाहरणे “झेनमधे सर्वात महत्वाची उत्स्फूर्तता व तत्परता. ती ताजी ठेवणं महत्वाचं आहे. “ “सौन्दर्यानुभवात स्मरणशक्तीला स्थान नसतं. कला, आस्वाद व निर्मितीसाठी सदैव जागरूकतेची गरज असते.” तसंच “रंगचित्रणाच्या प्रक्रियेत विचारांना थारा नसतो.” “झेन म्हणजे एका क्षणात होणारी चित्रकार, रंग व कॅनव्हास या सर्वांची युती होते. सर्व समलय होतं.” “रंगचित्रणाची स्फूर्ती केव्हाही, कुठेही उगवते - कधी मासिक चाळताना, नृत्य बघताना, सिनेमा बघताना, वा हालचालीच्या गतीमध्ये.”  

 “बुद्धाची असीम शांतता जर लाभली, तर माझं रंगचित्रण आपोआप थांबेल.”
“कलाकार दुःखात बेचैन असताना सुंदर कलाकृती घडवू शकत नाही.” “चित्र रंगवताना कॅनव्हासपुढे मी विस्मयपूर्ण अवस्थेत उभा असतो.” आणि शेवटचे वाक्य “कलानिर्मिती ही ईश्वरकृपा आहे आणि म्हणूनच वैयक्तिक यशाची गुढी नव्हे.” ही वक्तव्ये खासच प्रतिभाशाली व्यक्तीच्या संवेदनाच व्यक्त करतात. गायतोंडेंच्या स्वभावाचेही - अबोल, अंतर्मुखी, मनस्वी स्वतःमध्ये परिपूर्ण, जीवन आणि चित्रकला यामध्ये तल्लीन असं डेंगळेनी वर्णन केलं आहे.

गायतोंडेंना संगीतकार बारवच्या संगीतात खास रस होता. तसंच हिंदुस्थानी व्हायोलिन हे वाद्य कायम दुःखाशीच जोडलेलं का असावं ही त्यांची खंत होती. “प्रेमात मी सुदैवी आहे.” असे उद्गार ते काढीत असत.

गायतोंडेंची चित्रं ज्या मुंबईच्या पंडोल गॅलरीतून विकली जात तिचे मालक दादीबा पंडोल यांनी लिहिलेल्या लेखात गायतोंडेंचा सहज उदार दृष्टिकोन, चित्रांविषयीची कसलीही, कोणतीही मागणी नसणं नि त्यांचं अध्यात्मिक चिंतन याविषयी ते लिहितात. त्यांच्या आयष्यभर जी परिस्थिती त्यांच्यासमोर आली तिला ते विनातक्रार सामोरे गेले. त्यांच्यापुढे भौतिक सुखाचा विचार नव्हता - असं स्पष्ट प्रतिपादन ते करतात. ते फक्त वर्तमानात कसे जगात होते ते सांगून त्यांच्या अनाग्रही स्वभावाची वाखाणणी दादीबा करतात. त्यांच्या मते “पेंटिंग हा त्यांचा खाजगी अवकाश होता.” हे निखळ सत्य आहे. शेवटी शेवटी ते त्यांच्याशी अस्खलित गुजरातीत बोलल्याचं नंतर त्यांना आश्चर्य वाटतंय.

सुनील काळदाते पॅरिसचे रहिवासी. यांनी गायतोंडेंवर १९९५ मध्ये जी २६ मिनिटांची  तयार केली त्यावेळच्या दिल्लीतल्या त्यांच्या स्टुडिओतल्या अनुभवांवर त्यांनी लिहिलेल्या लेखात ते म्हणतात “सुरवातीला संगीतकार शुबेरवरून माझी व त्यांची वेव्हलेंग्थ जुळली.” संगीताने जोडला गेलेला माणूस तुटत नसावा. एका ऋषीसदृश जीवन जगलेल्या कलावंतांवर त्यांच्या दिनचर्येत कुठेही व्यत्यय न आणता त्यांच्या स्टुडिओत चित्रण करायचं, या अटीवर काम करण्याचं आव्हान सुनीलने पेललं नि एका अप्रतिम फिल्मचा जन्म झाला. तिला पॅरिस बिनाले आर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये आलेल्या आठशे फिल्म्सपैकी निवडक फिल्मचा मान तर मिळालाच पण त्यांच्या कलाजगतात जगभर कौतुक झालं. गायतोंडेंवर निर्माण झालेली ती एक दुर्मिळ फिल्म त्यांत सुनीलने जे दिसतंय जे घडतंय तेच फिल्ममध्ये चित्रित केलंय.

गंमत म्हणजे या फिल्मसाठी वापरायला खास निवड करून आणलेली शुबेरची संगीत कॅसेट नि त्याच संगीताची गायतोंडेंकडे असलेली ग्रामोफोन रेकॉर्ड नेमकी तीच निघावी हा अतर्क्य असा योगायोग होता की चमत्कार की अंतःस्फूर्तीचा प्रकार होता. पण हे सारं विलक्षण गायतोंडेंच्या बाबतीत घडलं यात काहीच विशेष नाही… नसावं की नियतीचा खेळ की केवळ झेनचं साक्षात घडणं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे गायतोंडेंनी ही स्वतःवरची फिल्म पाहिलेली नाही. तो योग मात्र आला नाही, हेही अतर्क्यच. पण गायतोंडेंसाठी तर ठीकच. त्यांनी आयुष्यभर जी निरिच्छ वृत्ती दाखवली ती काय वाया थोडीच जाणार ? सदैव विरक्त स्थितीतला हा त्यागी कलावंत नाहीतर प्रीतीश नंदीला दिलेल्या मुलाखतीत म्हणूनच राहिलाय ना “मी संन्यासी आहेच.” फकिरी जीवनाचा बाणा पत्करणाऱ्या कलाकाराला नियतीने केलेला हा एक सलामच !

नितीन दादरावाला यांच्या लेखात सुनील काळदातेबरोबर फिल्म चित्रित करण्यासाठी गेले असताना १०-१२ दिवसात त्यांच्याशी झालेल्या चर्चेचा गोषवारा दिलाय. एक चित्रकार आपलं आयुष्य कसं व्यतीत करतो, त्याचे आदर्शच या लेखात दिसून येतात. नितीनच्या लेखात गायतोंडेंमुळे झालेली ‘झेन’ तत्वज्ञानाशी त्याची ओळख व त्या तत्वज्ञानाचा त्याच्या जीवनावर झालेला सहज परिणाम व त्यांच्या पेंटिंगच्या तंत्राबद्दल विस्ताराने अमूल्य माहिती आलीय. त्यांची काही सूत्रबद्ध वचनं खरं तर मनात चिंतन करण्यासारखीच आहेत.
 
उदा . "माझं पेंटिंग हे एका व्यक्तीच नाही, तर ते मानव जातीच्या वारशाचं पेंटिंग आहे.
- झेनमुळे मी प्रत्येक कृतीविषयी जागरूक झालो.  प्रत्येक गोष्टीकडे तत्वज्ञात्मक दृटीने पाहायला लागलो"
- पेन्टिंग करणं हे समाधीसारखंच आहे." "रमण महर्षी, पॉल क्ली  हे माझे गुरु होते."
- "भक्तिमार्गाचा शेवट म्हणजे ज्ञानमार्ग"
आणि त्याच एक अतिशय महत्वाचं नि जीवनाचं जणू सार सांगणारच वक्तव्य आहे, ते म्हणजे
- "यु कॅन नॉट पझेस एनीथिंग" (कुठलीही गोष्ट तुमच्या मालकीची नसते.) यालाच समांतर अशा अर्थच एक वाक्य गायतोंडे मनोहर म्हात्रेंकडे बोलले होते ' ते होत -
- " माझ्या जगण्यावर कोणाचा अधिकार नाही " वास्तवाची एवढी सूत्रबद्ध मांडणी एखाद्या विरक्त माणसाशिवाय आणखी कोण करू शकतो ?
हा तर खराखुरा सन्यासी चित्रकार. सर्वांच्या पल्याड पोहोचलेला, अंतर्यामी स्थिरचित शांत असलेला. केवळ स्व-स्वरुपात विलीन होणारा, विसर्जित झालेला.

तरीही या लोभस पुस्तकातल्या गायतोंडेंच्या मुलाखती नि संवाद या गोष्टी माझ्याकडून अस्पर्शितच  राहिल्यात याची मला जाणीव आहे. त्यात तर त्यांच्या प्रतिभादर्शी व्यक्तिमत्वाच्या ज्ञानाचा, विचारांचा, कलेचा, सौदंर्यदृष्टीचा नि संवेदनांचा खजिनाच भरलाय. या मुलाखतींपैकी काही मुलाखतींची अनुवाद करण्याची संधी सुदैवानं  मला मिळाली त्यामुळे या पुस्तकाशी जडलेलं माझं नातं हे खरोखरीच अमोल आहे. या पुस्तकाचं वाचन हा एक अतिशय आनंददायक भाग आहे. पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर आपण त्याच्या मोहात पडतो. साऱ्या कलावंतांनी चित्रकार, शिल्पकार, नर्तक नट - नट्या याचबरोबर कलेचे विद्यार्थी कलासंस्था, वाचनालये, सार्वजनिक संस्था, म्युझियम, आर्ट गॅलऱ्या नि सर्व कलाविषयक उपक्रमातील सर्वानी हे पुस्तक विकत घेऊन वाचावं आणि  संग्रही ठेवावं असंच आहे यात तिळमात्र शंका नाही. यासाठी "चिन्ह" प्रकाशन व ‘गायतोंडे’ ग्रंथाचे सर्व लेखक, अनुवादक, प्रकाशचित्रकार, सहकलाकार व पूर्ण सहकारी या सर्वांच्या परिश्रमांमुळे हा ग्रंथ सर्वार्थाने एक देखणा अभिजात ग्रंथ झालाय.

गायतोंडेंच्या रंगचित्रांतून सतत काहीतरी स्फुरल्यासारखं वाटत राहतं. चैतन्यदायी स्पंदन त्यातून अविरत व्यक्त होत राहतात. त्यांनी निसर्गातून नि तत्वज्ञानातून जे नि जसं कांही पाहिलं ते त्यांच्या चिंतन-मननातून नि वाचनातून आपसूकच चित्रात प्रगट होत राहिलं. झेन बुद्धीझमच्या वाचनामुळे त्यांचा मानसिक रियाझ उत्तम झाला होता. अत्यंत  शांत निर्विकार मनाने एकदा का ते कॅनव्हास पुढे उभे राहिले, की त्यांना उत्स्फूर्तपणे पेंटिंग सुचत राही. रंग नव्याने उमगत. त्यांना चित्रांसाठी मूळ प्रेरणा रंगातूनच मिळत.
त्यांच्या चित्रातल्या रंगांची आभा विलक्षण नवी असायची आणि ती चित्रं पाहताना अदभूताचं नि विस्मयाचं दर्शन व्हायचं. अन्यथा एका भयंकर जीवघेण्या अपघातातून सावरलेल्या गायतोंडेंनी एवढी नियतीवर मात करणारी श्रेष्ठ कला निर्माणच केली नसती .

खरं म्हणजे वासुदेव गायतोंडे हे एका प्रकारे पौर्वात्य घाटणीचे व विचारसरणीचे खरेखुरे देशी चित्रकार होते असं म्हणणं कदाचित जास्त योग्य ठरेल. त्यांची चित्रही शांत, उद्दात, निरागस व काहीशी अमूर्त वाटतात. सतत एका अज्ञाताचा, अमूर्ततेचा त्यांना ध्यास होता. कलेचं हाती घेतलेला वसा त्यांनी शेवटपर्यंत सोडला नाही. संत सोहिरोबानाथ आंबिये यांचं एक प्रसिद्ध पद आहे. त्यात ते म्हणतात - "हरिभजनावीण काळ घालवू नको रे ! अंतरीचा ज्ञानदीप मालवु नको रे !!” त्यांच्या अभंगाशी गायतोंडे यांचं जणू एक अतूट नातं असावं आणि म्हणूनच त्यांच्या चैतन्यमय, ओजस्वी रंगातल्या असंख्य रंगचित्रांतूनच, त्यांच्या अंतर्यामीच्या सौन्दर्यदृष्टीचा रंगोत्सव - ज्ञानोत्सव असाच अविरत उजळत राहिलाय…

समाप्त  …
या विषयी अधिक जाणून घेण्यासाठी फेसबुकाच्या गायतोंडे पेजला भेट दया !

https://www.facebook.com/Gaitonde%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-164757170298118/?ref=bookmarks

निवडक चिन्ह च्या सवलत योजनेत सहभागी व्हा आणि ३००० रुपये किमतीचा गायतोंडे महाग्रंथ चक्क भेट मिळवा.
अधिक माहितीसाठी 90040 34903 या नंबरवर फोन करा किवा whatusp मेसेज करा.

Saturday, May 21, 2016

फायनली…!
' चिन्ह 'चं ' गायतोंडे ' मिशन अखेर पूर्ण झालं .
प्रवास सहज सोपा नव्हता .
प्रत्येक टप्प्यावर संघर्ष करावा लागला , झगडावं लागलं , 
साहजिकच प्रत्येक बाबतीतच विलंब सहन करावा लागला .
पण ' चिन्ह ' वरच्या वाचकांच्या आत्यंतिक विश्वासामुळे
साऱ्यातूनच तरून गेलो .
उतलो नाही , मातलो नाही .
घेतला वसा टाकला नाही .
आता कुणीही काहीही करो
इतिहास कसाही का लिहो .
' चिन्ह ' आणि ' गायतोंडे ' हे समीकरण कुणालाच
कधीच बदलता येणार नाही हे निश्चित .
ग्रंथ हाती पडताच प्रत्येक वाचकाचं , कलारसिकाचं हेच मत होईल
याची आम्हाला खात्री आहे .
***
प्रती हाती पडताच ' गायतोंडे ' ग्रंथाच्या प्रतींचं वितरण सुरू झालंदेखील .
पहिली प्रत गेली ती थेट अमेरिकेलाच .
नोंदणी झालेल्या सर्वच प्रतींचं वितरण सुरू झालं आहे
.

Friday, February 5, 2016

' गायतोंडे ' ग्रंथ आहे तरी कसा ?



' गायतोंडे ' ग्रंथ म्हणजे नक्की काय आहे ? चित्रकलेवरचं पुस्तक का चित्रकाराचं चरित्र ? असा प्रश्न मला अनेकदा विचारला जातो . मला वाटतं की या दोन्ही चष्म्यातून या ग्रंथाकडे पाहिलं जाऊ नये . कारण त्यात पानोपानी चित्र आहेत पण म्हणून तो चित्रकलेवरचा ग्रंथ आहे असं काही म्हणता येणार नाही. त्यात चित्रकाराच्या म्हणजे इथं गायतोंडे यांच्या सत्याहत्तर वर्षाच्या आयुष्यात घडलेले सारेच महत्त्वाचे प्रसंग नोंदले गेले आहेत, पण म्हणून त्याला काही चरित्र ग्रंथ म्हणता येणार नाही. 

हा एक अभिनव प्रयोग आहे . पण प्रयोग असा शब्द वापरला म्हणून कुणी दचकून जाण्याची गरज नाही . 

पेंटिंगखेरीज स्वतःचा कुठलाच आगापिछा न ठेवलेल्या अगदी आपल्या आसपासही कुणालाच कधी फिरकू न देणाऱ्या चित्रकार गायतोंडे यांच्या आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर ज्या काही मोजक्या व्यक्ती आल्या अन नंतर दूरही निघून गेल्या अशा साऱ्यांनी आपल्याला भावलेले गायतोंडे कसे होते हे  सांगण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या खटाटोपातून 'गायतोंडे ' यांच्या ज्या कॅलिडोस्कोपिक प्रतिमा उभ्या राहिल्या त्याचं दर्शन म्हणजे हा ग्रंथ . हा ग्रंथ म्हणजे  रूढार्थानं चरित्र नव्हे असं जे मी म्हणतो ते म्हणूनच . 
त्यांच्या आयुष्यातल्या  सर्वच घटना या ग्रंथात गुंफण्याचा प्रयत्न मी केला आहे. पण त्यात सर्वसाधारणपणे  चरित्र ग्रंथात असतो तसा बालपणापासून ते मोठे  होण्याचा काळ क्रमशः चित्रित करण्याचं मात्र टाळलं आहे . त्यामुळे चरित्रांचं वाचन करताना सर्वसाधारणपणे वाचक बालपणीच्या  तपशीलाची पानं  वगळत हटकून पुढे जातो तसं इथं होण्याची शक्यता नाही . 

' गायतोंडे ' यांच्यापेक्षा २० वर्षांनी लहान असलेल्या त्यांच्या बहिणीच्या प्रदीर्घ लेखानं या ग्रंथाची सुरूवात होते . तो वाचत असतानाच वाचक गायतोंडे यांच्या लोकविलक्षण जगण्यानं आणि सर्वसाधारण माणसं ज्याला विक्षिप्त असं म्हणतात तशा काहीशा वागण्यानं अक्षरशः दबकून जातो .बापरे , एखादा कलावंत असा जगू शकतो? वागू शकतो? अशा प्रश्नांनी तो अस्वस्थ होतो . 

अन मग जसजसा वाचक या ग्रंथात पुढं पुढं जात राहतो तसतशा गायतोंडे यांच्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीदेखील वाचकाला भेटत राहतात आणि  आपआपल्या जाणीव नेणीवेतून  आपल्याला स्वतःला भावलेले गायतोंडे शब्दबद्ध करीत राहतात . 

सर्वसाधारणपणे चरित्रात असतो तसा चरित्र लेखक नावाचा प्राणी या संपूर्ण ग्रंथात अनुपस्थित असल्याने आणि गायतोंडे यांचे आप्त , मित्र , स्नेही हे स्वतःच गायतोंडे यांच्याविषयी भरभरून व  अत्यंत प्रांजळपणानं सारं काही सांगत असल्याने त्या संवादात तो  अक्षरशः अडकून पडतो . सोबतीला प्रत्येक पानाआड गायतोंडे यांची पेंटिंग्ज ज्यांची किंमत जगाच्या बाजारात आज कोट्यवधी डॉलर्स मध्ये केली जाते ती पेंटिंग्ज पहावयास मिळत असल्याने तो अक्षरशः थिजून जातो . 

 ' गायतोंडे ' ग्रंथाचं जे काही अनोखंपण , वेगळंपण आहे ते यातच आहे . अर्थात हे आमचं मत आहे . हे सारं उभं करताना हेच नेमकं  आम्ही योजल  होतं आणि पुढं  असंच ते सारं घडत गेलं . ३० जानेवारी नंतर तुम्ही तुमचं मत इथं देखील नोंदवू शकता .  

जिद्दी गायतोंडे …

चित्रकारांना खरी प्रसिद्धी मिळू लागते ती उतारवयातच . 
म्हणजे जवळ जवळ साठीच्या आसपास .
( हुसेनसारखे चित्रकार त्याला अपवाद असू शकतात . कारण ते आपल्या 

कामापेक्षा अन्य गोष्टीनीच लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधू शकतात .)
गायतोंडे यांचंदेखील तसंच झालं . 
साठीच्या उंबरठ्यावर असताना गायतोंडे यांचा एक भीषण अपघात झाला . 
या अपघातात ते वाचले खरे 
पण नंतरच्या आयुष्यात त्यांना कायमचंच पंगुत्व आलं .



कल्पना करा अपघातामुळे धडपणानं उभं राहता येत नसेल 
खाल्लेलं अन्न गिळता येत नसेल 
खाता खाता , बोलता बोलता जीभ लोंबून बाहेर येत असेल 
अशावेळी ज्याच्यावर हे बेतलं आहे त्याची काय अवस्था झाली असेल ? 
पण गायतोंडे मात्र खचले नाहीत ….


त्या अपघातानंतर तब्बल आठ - नऊ वर्षाचा काळ 
ते आपल्या स्टुडिओतल्या खुर्चीवर कोऱ्या कॅनव्हाससमोर बसून राहिले
फक्त विचार करीत , मनन करत , चिंतन करत .


आणि आठ - नऊ वर्षानं एके दिवशी उठून कामाला देखील लागले .
पेंटिंग करू लागले . त्यातलीच निवडक पेंटिंग या पोस्टमध्ये वापरली आहे . 
याच काळात सुनील काळदातेनं त्यांच्यावरची फिल्म पूर्ण केली .
याच काळात प्रीतीश नंदी यांनी त्यांची ती गाजलेली मुलाखत घेतली .
त्यांचा हा साराच उफराटा प्रवास त्यांच्यावरच्या या ग्रंथात 
अतिशय मनोज्ञपणे चित्रित झाला आहे . 
जो भविष्यातील अनेक पिढ्यांना
स्फूर्तीदायक , प्रेरणादायक ठरू शकेल .

Monday, January 4, 2016


काही गोष्टी अव्यक्तच राहाव्यात…   
गायतोंडे , त्यांची तथाकथित प्रेयसी आणि मी … 


गायतोंडे यांचा आणि माझा थेट असा परिचय कधी झालाच नाही . कारण मी जेव्हा जेजेत प्रवेश केला तेव्हा ते मुंबई सोडून कायमचे दिल्लीला गेले होते . त्यामुळे त्यांच्याशी भेटणं , बोलणं राहू द्या त्यांना कधी दुरून पाहायची संधीदेखील मला लाभली नाही . जिनं त्यांना शेवटपर्यंत साथ दिली त्या त्यांच्या दिल्लीतल्या मैत्रिणीनं एकदा मला नंतर गायतोंडे यांना भेटण्यासाठी दिल्लीत येण्याचं निमंत्रणही दिलं होतं , पण माझ्या इतर व्यापांमुळे मला ते जमलं नाही . तो योग जमून आला नाही याचं नंतर मला खूप वाईट वाटलं . कारण नंतरच्या एक दोन वर्षातच गायतोंडे गेले . त्यांच्यावरच्या फिल्मच्या मुंबईतल्या शोच्या निमित्तानं त्यांनी मुंबईत यावं , यासाठीही मी खूप प्रयत्न केले पण तोही योग जुळून आला नाही . त्यामुळेच त्यांची माझी भेट होता होता अखेरीस राहिली ती राहिलीच . 

***
पण आमच्या मर्यादित चित्रकला वर्तुळात ज्यांच्या नावाविषयी अधनमधन चर्चा चालत त्या गायतोंडे यांच्या तथाकथित प्रेयसीला मात्र मी भेटलो होतो . इतकंच नाहीतर त्यांच्याशी माझी खूप छान मैत्रीदेखील झाली होती . तीही थोडी थोडकी नाहीतर तब्बल  दोन - तीन  तपाची . गायतोंडे यांच्या परिचयातल्या अनेकांना त्या विषयी कुजबुजताना मी ऐकलं होतं . पण अशा प्रकरणात शक्यतो जाहीरपणे काही बोलायचं नाही , कुणी दुखावलं जाईल असं विधान करायचं नाही हे शहाणपण मी अनुभवातून शिकलो होतो . साहजिकच ' गायतोंडेच्या शोधात…' विशेषांकात अनेकांच्या शब्दांकनात वेगवेगळ्या अंगानं त्याविषयी झालेलं उल्लेख , मी अत्यंत संयमीतपणे संपादीत केले होते . त्यामुळेच की काय कुणास ठाऊक प्रत्यक्ष अंक प्रसिद्ध झाल्यावर मला काही फारसं टीकेला तोंड द्यावं लागलं नाही .

***

त्यांच्या आणि माझ्या वयात २५ - ३० वर्षाचं अंतर . पण त्यांच्यासोबतच्या मैत्रीमध्ये ते कधी फारसं जाणवलंच नाही . त्या मला जवळचा मित्र मानायच्या . कलाक्षेत्रात किंवा सांस्कृतिक क्षेत्रात वावरताना त्या माझी ओळख मित्र म्हणूनच करून द्यायच्या . नात्यातली मंडळी भेटली म्हणजे माझा उल्लेख चक्क भाऊ म्हणून देखील करायच्या . सकाळी आठ ते साडे आठच्या दरम्यान त्यांचा फोन आला नाही असं क्वचितच व्हायचं . तेही थोडा थोडका काळ नाही तर तब्बल दहा - पंधरा वर्ष . कधी त्यांचा फोन आला नाही तर न राहावून मीच त्यांना फोन करायचो . फोनवर प्रचंड गप्पा , गप्पा आणि गप्पा . या गप्पा  चित्रकलेबद्दल थोड्या तर चित्रकला क्षेत्रातल्या राजकारणाबद्दलच अधिक असायच्या , तर कधी संगीत , कधी नाटक , तर कधी सांस्कृतिक क्षेत्रांबद्दलसुद्धा . अर्धा - अर्धा , एक - एक तास आमचं फोनवरचं संभाषण चालायचं . आमच्या फोनवर एन्गेज टोन वाजू लागला का मित्रमंडळी समजायची की त्यांचं आणि माझं संभाषण चालू आहे , आता निदान तासभर तरी या दोघांना पुन्हा फोन करू नये . 

फोनवर नुसता सुखसंवादच नाही चालायचा , तर बऱ्याचदा कचाकचा भांडणंदेखील व्हायची , त्या अतिशय फटकळ होत्या आणि संतापीदेखील . आणि मीदेखील त्यांच्या दुप्पट फटकळ आणि महासंतापी . ( गायतोंडे देखील असेच होते . असं त्यांचे स्नेही सांगायचे . ) साहजिकच आमची जाम हमरी तुमरी व्हायची . फोनवर आदळा आपट व्हायची , फोन हमखास आपटून बंद केला जायचा . पण असं काही झालं म्हणजे दुसऱ्या दिवशी नेहमीच्या वेळेपेक्षा अर्धातास आधीच त्यांच्या फोन यायचा किंवा मीच त्यांना फोन करायचो . पण मग नंतर होणाऱ्या संभाषणात आदल्या दिवसाच्या भांडणाचा मागमूसदेखील नसायचा . 

***

एके दिवशी मात्र आमचं भयंकरच मोठं कडाक्याच भांडण झालं . चूक त्यांचीच होती . माझ्या बाबतीत कायच्या काय समज करून घेऊन , कायच्या काय करायचं त्यांनी मनात आणलं होतं . साहजिकच मी प्रचंड संतापलो . आपल्या आई वडिलांच्या वयाच्या व्यक्तीवर इतकं संतापू नये हे चांगलं ठाऊक असूनही मी संतापलो . इतका की मी त्यांना म्हणालो " तुम्ही लवकर मरत का नाही ? म्हणजे तुमच्या कचाट्यातून मुंबईच्या चित्रकला वर्तुळाची सुटका तरी होईल ." हे मी बोललो आणि पलीकडून फोन टाकून दिल्याचा आवाज आला आणि मग सारं शांत झालं . मीही संतापलेलो होतो , मी पण फोन आदळून ठेऊन दिला . तो दिवस खूपच अस्वस्थ अवस्थेत गेला . म्हटलं " झालं ! हा अध्याय संपला आता . आपल्या आयुष्यातून आणखी एक व्यक्ती आपल्या फटकळ स्वभावामुळे वजा झाली ." 

दुसऱ्या दिवशी उठलो तो फोनच्या आवाजानंच . पाहतो तर काय त्यांचाच फोन . फोनवरच्या संभाषणात कालच्या भांडणाचा मागमूसदेखील नव्हता . मी हळूच विचारलं " काल रिसिव्हर फेकून दिलात की हातून गळून पडला ? " तर हसून म्हणाल्या " अरे तुझा तो प्रश्न ऐकून मला एकदम रडूच फुटलं . आणि रिसिव्हर माझ्या हातून कधी गळून पडला मला कळलंदेखील नाही . मी नंतर कितीतरी वेळ तशीच रडत बसले ." त्यांचं हे इतकं प्रांजळ बोलणं ऐकल्यावर मी काय त्यांच्यावर राग धरणार , कप्पाळ ? ज्यांच्याशी आपलं जमतं किंवा कधी काळी अतिशय छान जमत होतं अशा व्यक्तींशी कितीही जरी मोठे मतभेद झाले तरीही आपला संवाद हा असा तटकन तोडून द्यायचा नसतो हा धडा त्यांनी काहीही न बोलता आपल्या वागण्यातून मला चांगलाच शिकवला होता . साहजिकच आमचं हे फोनवरचं संभाषण वर्षानुवर्ष तसंच चालू राहिलं . 

***
जगण्याचे संदर्भ बदलू लागले की आपण आयुष्यातील अनेक गोष्टी हळू हळू वजा करू  लागतो . जुने संपर्क हटकून हळू हळू कमी करू लागतो . तसंच काहीसं त्यांच्या माझ्या मैत्रीमध्ये होत गेलं . नेहमी येणाऱ्या फोनमध्ये हळू हळू खूप मोठं परिवर्तन होत होत त्यांचं रुपांतर सटीसहमशी येणाऱ्या फोनमध्ये होऊन  कसं गेलं ते माझं मलाही कधी कळलंच नाही .  

***
त्यांच्या बरोबरच्या तब्बल दोन तपाच्या प्रदीर्घ मैत्रीत गायतोंडे हा विषय आमच्या संभाषणात कधी आलाच नाही . कलावर्तुळातदेखील खूप गॉसीप्स चालतात . मी ती ऐकूनही होतो पण त्याविषयी विचारावं असं मात्र मला कधी वाटलंही नाही . पण एकदा मात्र त्यांचा बोलायचा मूड पाहून मी तो विषय काढलाच . व्यावसायिक पत्रकारितेत असल्यामुळे पत्रकारांमध्ये असलेला जातीवंत भोचकपणा माझ्याही अंगात थोडा बहुत भिनलेला होता . तो सारा एकवटून मी त्यांना टोकलं , तर त्या म्हणाला " हो ! हो ! मीही असं ऐकलंय . ' गाय ' ला माझ्यात इन्ट्रेस्ट होता . त्याला माझं आकर्षण होतं . पण मला मात्र तो फक्त मित्र म्हणूनच आवडायचा . तो हा असा ठेंगू आणि मी त्याच्यापेक्षा उंच . त्या दृष्टीनं त्याच्याकडे मी कधी पाहिलंच नाही . अरे चल माझी गाडी आली बघ . ही मी चालले . पुन्हा भेटू . बाय बाय ! वाघ पाठीशी लागल्याप्रमाणं त्या भरकन निघूनदेखील गेल्या . त्यानंतर मात्र मी हा विषय त्यांच्याकडे कधी काढलाच नाही .

*** 

गायतोंडे यांची पेंटिंग कोट्यवधींचा प्रवास करू लागली आणि नंतर ती २३ कोटी ७० लाखाची बातमी प्रसिद्ध झाली तेव्हा मात्र त्यांना मनापासून विचारावसं वाटलं की ' तेव्हा निर्णय घेण्यात तुम्ही चुकलात असं तुम्हाला आज वाटतं का ? ' पण ते धाडस अर्थातच माझ्याच्यानं काही झालं नाही . कारण तोपर्यंत पत्रकारिता सोडून मलाही खूप वर्ष झाली होती आणि वयोमानपरत्वे  त्याही खूप थकल्या होत्या , नानाविध आजारांना तोंड देत होत्या . साहजिकच मी तो प्रश्न काही त्यांना विचारू शकलो नाही . 

परवा गायतोंडे यांचं पेंटिंग २९ कोटीला गेल्याची बातमी आली तेव्हा मात्र त्यांची प्रकर्षानं आठवण झाली . पण माझ्या भोचक प्रश्नाचं उत्तर द्यायला आता त्या या जगात राहिल्या नव्हत्या … 

***
कधी कधी या साऱ्यावर मी जेव्हा विचार करतो तेव्हा असं वाटतं की समजा जर तेव्हा वासुदेव गायतोंडे यांना त्यांनी होकार दिला असता , तर आता केवळ आपणच नाही तर सारं जगच ज्यांना चित्रकार गायतोंडे म्हणून ओळखतं ते गायतोंडे आपल्याला दिसले असते का ? 

***

कुणास ठाऊक ? अशा जर तरच्या प्रश्नांना खरं तर काही अर्थ नसतो , पण ते पडत राहतात , सारखे सारखे छळत राहतात .


सतीश नाईक 
संपादक ' चिन्ह ' 

वि . सू .: मला ठाऊक आहे आज मी जे लिहिलं आहे त्यानं तुमचं औत्सुक्य भलतंच वाढलेलं असणार . गायतोंडे यांची ' ती ' प्रेयसी म्हणजे कोण ? असा प्रश्न तुम्हाला सतत सतावत राहणार . पण मला याविषयावर आणखी काहीही सांगायचं नाही किंवा त्यांचं नाव तर कधीच उघड करायचं नाही . हे सारं वाचल्यावर फेसबुकवर ' म्हणजे त्या ' त्या ' का ? ' ' त्यांचं नाव अमुक का ? ' ' तमक्याविषयी तुम्ही लिहिलंय का ? ' असल्या भोचक कमेंटस करून आपल्याला सारं ठाऊकेय असंही कृपया कुणी सूचित करण्याचा प्रयत्न करू नये ही विनंती . तसं पाहिलं तर आयुष्यात घडणाऱ्या सगळ्याच गोष्टी कुठं आपल्याला कळत असतात ? ही पण आणखीन एक न कळणारी गोष्ट समजायचं अन कामाला लागायचं . आयुष्यातल्या काही गोष्टी या अव्यक्तच राहायला हव्यात . नाही का ? 


***  

या ग्रंथाची ३००० रु किंमतीची कलेक्टर्स एडिशन प्रकाशनाआधीच बुक झाली आहे .
म्हणूनच ' जनआवृत्तीची ' तुमची प्रत आज नाही आत्ताच बुक करा .
सवलत योजना संपायला आता फक्त सहाच दिवस शिल्लक राहिलेत . 
९००४० ३४९०३ या नंबरवर ' Gai - Jan ' या संदेशासह 
तुमचा नाव , पत्ता आणि ई मेल आयडी पाठवा 
आणि ५०० ची जनआवृत्ती प्रकाशनपूर्व सवलत योजनेमध्ये फक्त ३५० मध्ये घरपोच मिळवा .

Sunday, January 3, 2016

गायतोंडे यांच्या पेंटिंगचा आणखीन एक विक्रम… आणि त्यांच्यावरील ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाची जाहीर घोषणा…

ख्रिस्तीजच्या काल रात्री मुंबईत झालेल्या तिसऱ्या जागतिक लिलावात गायतोंडे यांच्या चित्रानं पुन्हा एकदा विक्रमी बोली पटकवण्याचा मान मिळवला आहे . त्यांचं १९९५ सालातलं पेंटिंग तब्बल २९ कोटी ३० लाख २५ हजार इतक्या विक्रमी किंमतीला विकलं गेलं आहे . या विक्रमी बोलीनं भारतीय चित्रकलेच्या क्षेत्रातले आजवरचे सारेच विक्रम मोडीत निघाले आहेत . या भारतीय चित्रकलेच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाच्या ठरणाऱ्या घटनेच्या निमित्ताने ' चिन्ह ' आणखीन बरोब्बर ४५ दिवसांनी होणाऱ्या त्यांच्यावरील कोणत्याही भाषेत पहिला ठरू शकेल अशा महत्वाकांक्षी ग्रंथाच्या प्रकाशन समारंभाची घोषणा करू इच्छिते . त्यांच्यावरील ग्रंथाचा पहिला मान मराठी भाषेला मिळतोय याचा आम्हाला अभिमान आहे .


चित्रकार गायतोंडे यांना ज्यांचं गाणं विशेष प्रिय होतं त्या गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्याच हस्ते दि ३० जानेवारी २०१६ रोजी मुंबईत ' चिन्ह ' चा महत्वाकांक्षी ग्रंथ ' गायतोंडे ' प्रसिद्ध होणार आहे . गायतोंडे यांच्या प्रती दिली जाणारी आदरांजली असं या कार्यक्रमाचं स्वरूप राहणार असून या ग्रंथाचे संपादक ' चिन्ह ' चे सतीश नाईक , गायतोंडे यांना गुरुस्थानी मानणारे प्रख्यात चित्रकार लक्ष्मण श्रेष्ठ , दिल्लीतल्या दहा वर्षाच्या वास्तव्यात ज्यांच्याशी गायतोंडे यांचे स्नेहबंध निर्माण झाले होते ते नामवंत आर्किटेक्ट नरेंद्र डेंगळे , गायतोंडे यांचे गोवेकर आप्त शांताराम वर्दे वालावलीकार आणि ज्यांची चित्रं गायतोंडे यांना विशेष आवडत व ज्यांनी या ग्रंथाला प्रस्तावना लिहिली आहे ते चित्रकार प्रभाकर कोलते तसेच हा ग्रंथ अत्यंत दिमाखदारपणे प्रसिद्ध होण्यास ज्यांनी विशेष सहकार्य दिलं ते ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर या कार्यक्रमात मुख्य वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत . याप्रसंगी डॉ प्रिया जामकर या ग्रंथातील निवडक वेच्यांचे अभिवाचन करणार आहेत तर प्रख्यात अभिनेते संदीप कुलकर्णी हे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहेत .